विनील भुर्के
‘‘तुम्ही राहता त्या देशात लोकशाही आहे का हो?’’ असा प्रश्न विचारला तर काय उत्तर द्याल? ‘‘हुकूमशाही नेहमीच कुठल्या तरी दूरच्या देशात असते, माझ्या देशात लोकशाही आहेच. त्यामुळे मी याचा विचार कशासाठी करायचा?’’ असं म्हणाल की, लोकशाही किंवा हुकूमशाही म्हणजे काय, असा प्रश्न विचाराल? तुमचं उत्तर यापैकी कुठलंही असेल, तरीही ‘जगभरातले धटिंगण’ हे छोटेखानी पुस्तक तुम्हाला या विषयावर अंतर्मुख होऊन विचार करायला लावेल.

आधुनिक काळात समूहाने राहणाऱ्या माणसाने लावलेल्या अनेक महत्त्वाच्या शोधांपैकी एक म्हणजे लोकशाही. मानवी संस्कृतीच्या आतापर्यंतच्या प्रदीर्घ इतिहासातील जंगलचा कायदा बदलत, अधिक न्यायाचे, समृद्ध करणारे, वैयक्तिक व सामूहिक आशाआकांक्षा पूर्ण करणारे आयुष्य समूहातील प्रत्येकाला, अगदी शेवटच्या स्तरातील व्यक्तीलाही मिळावे यासाठी माणसांनी कल्पिलेली (हो, कल्पिलेलीच, कारण ही व्यवस्था निसर्गाने किंवा देवाने जगाच्या सुरुवातीलाच निर्माण केलेली नक्कीच नाही!), समूहाला एकत्र बांधून ठेवणारी, सुसंस्कृत, सुजाण आणि सहिष्णू वर्तनाचा पाया असलेली व्यवस्था. एकंदर मानवी इतिहासात लोकशाही पद्धत आणि तिची मूल्ये निर्माण करून आणि ती पाळून सामूहिक जीवन जगण्याचा कालावधीसुद्धा अतिशय थोडका आहे. तुलनेने ‘बळी तो कान पिळी’ अशी रानटी अवस्था असलेला कालावधी खूपच मोठा आहे. म्हणूनच लोकशाही ही मानवाचे भविष्य एका अद्वितीय आणि उन्नत दिशेला नेण्याची एकमेव शक्यता आणि आशा आहे. त्याचवेळी ती एक आदर्शवत कल्पनासुद्धा आहे. कारण त्यात सर्वसामान्य जनता आणि त्यांच्यामधून तयार झालेले विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे हे चार स्तंभ किंवा लोकशाहीचे गाडे योग्य मार्गाने चालत राहावे यासाठी असलेले हे चार ‘लोकशाहीचे कठडे’ या सर्वांचे परस्परपूरक, निस्वार्थी व पारदर्शक व्यवहार यांवर ही व्यवस्था अवलंबून आहे. जोपर्यंत सर्व काही या आदर्श व्यवस्थेत कल्पिल्याप्रमाणे चाललेले असते, तोपर्यंत कोणाला त्याचे काहीच कौतुक वाटत नाही. परंतु जेव्हा ही व्यवस्था बिघडते, हेतुपुरस्सर बिघडवली जाते, पायदळी तुडवली जाते; तेव्हा मात्र तिचे महत्त्व लक्षात येते. या सगळ्यात एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, लोकशाही व्यवस्था नष्ट करण्याची आणि तिथे हुकूमशाही प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुरू होते, तीदेखील लोकशाही मार्गानेच! पुस्तकात सुरुवातीलाच दिलेले ‘‘Dictatorship naturally arises out of democracy and the most aggravated form of tyranny and slavery out of the most extreme liberty.’’ हे प्लेटोचे अवतरण वाचकाला हेच महत्त्वाचे भान देते.

Loksatta lokrang Sunanda Amarapurkar Mehta Publication Khulbhar Dudchi Kahani book
खलनायकाचा ‘सच्चा’ चेहरा
loksatta lokrang International human rights day rajni te rajiya autobiographical books
‘रजनी’च्या पुनर्शोधासाठी ‘रजिया’चा लढा
Sunil Gavaskar 75th Birthday Special boundary hero who allowed the Laxman Line to cross
‘लक्ष्मणरेषा’ पार करू देणारा बाउंड्रीवीर…
massive crowd gathered for team india world cup victory parade
अग्रलेख: उन्माद आणि उसासा
loksatta editorial on election results in france left wing alliance won most seat in french
अग्रलेख : फ्रेंच ट्विस्ट!
loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
Loksatta editorial uk elections kier starmer rishi sunak labour conservative party
अग्रलेख: मजुरोदय!
controversial trainee ias officer puja khedkar
अग्रलेख : बेबंदशाहीचे ‘पूजा’पाठ!

मुखपृष्ठावर उल्लेख केल्याप्रमाणे ‘लोकशाही मार्गाने सत्तेवर येऊन लोकशाहीलाच पायदळी तुडवणारे निरंकुश सत्ताधारी’ अर्थात ‘धटिंगण’ जगभरात अनेक आहेत. त्यांच्यापैकी निवडक दहा हुकूमशहा म्हणजेच रशिया, चीन, रुवांडा, सौदी अरेबिया, तुर्कस्तान, उत्तर कोरिया, ब्राझील, इथिओपिया, बेलारूस आणि हंगेरी या देशांमधील सध्या सत्तेत असलेले राज्यकर्ते त्यांच्या देशातील लोकशाही नष्ट करताना नेमके काय करत आहेत, याचे वर्णन करणाऱ्या दहा लेखांचे संपादित संकलन असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. हुकूमशहा का आणि कसे तयार होतात? त्यांच्या उदयाला त्या देशाचा इतिहास किती आणि कसा कारणीभूत असतो? आपली निरंकुश सत्ता ते कशाच्या जोरावर टिकवून ठेवतात? त्यांचे हे माणुसकीला काळिमा फासणारे वर्तन राजरोस चालू असताना त्यांच्या देशातील सामान्य नागरिक त्यांना विरोध का करत नाहीत? त्यांचा आवाज कसा दडपला जातो? काही वेळा सर्वसामान्य जनता लोकशाहीच्या ऱ्हासाबद्दल काहीही वाटेनासे होण्याच्या अवस्थेत जाते, ते कशामुळे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पुस्तक वाचताना मिळू लागतात. हुकूमशाही किंवा एकाधिकारशाही हा विषय आला की कुठल्याही हुकूमशहाची तुलना सर्रास हिटलरशी केली जाते. कारण आपला अभ्यास कमी असतो. अशी तुलना लाक्षणिक अर्थाने पटण्यासारखी असली तरी खरोखर अशी तुलना योग्य आहे का, असा प्रश्न पडतो. कारण एकंदरीत देशाचा आकार, लोकसंख्या, अर्थव्यवस्था, चालू काळ, जागतिक सत्ता-समतोल, युद्धखोरी, राज्यकर्त्यांची वैयक्तिक पार्श्वभूमी, त्यांच्या समर्थनासाठी केला जाणारा प्रोपगंडा, त्यासाठी तयार केली जाणारी खोटी माहिती, वापरली जाणारी प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पद्धतशीरपणे कमकुवत करून ढासळवलेले लोकशाहीचे कठडे, त्यासाठी लष्करी हिंसा व आर्थिक बळाचा वापर इत्यादी बाबींचा सखोल विचार केल्यावर असे लक्षात येते की, प्रत्येक हुकूमशहा अद्वितीय आहे. त्यांची एकमेकांशी सरसकट तुलना करणे योग्य नाही. अशा परिस्थितीत उगीच काहीतरी शाब्दिक कसरत करत अशी तुलना करण्यापेक्षा इतर अनेक परिमाणे वापरून त्यांची ज्यांच्याशी तुलना करता येणे सुसंगत आहे असे, हिटलरऐवजीचे नवे चालू काळातले पर्याय या पुस्तकामुळे सर्वसामान्य वाचकांना माहीत होतात. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हडेलहप्पी कारभाराला वैतागलेल्या अमेरिकन नागरिकांना उद्देशून भारतीय विनोदवीर वीर दास २०१७ मध्ये झालेल्या Conan या अमेरिकन टीव्ही शोमध्ये म्हणाला होता की, ‘‘अमेरिकनांनो, तुमचा देश हा एकाधिकारशाही असलेला जगातला एकमेव देश नाही बरं! हे पाहा, हे सर्व देशसुद्धा तुमच्या सोबत आहेत!’’ असे म्हणत त्याने हुकूमशाही, एकाधिकारशाही असलेल्या चक्क ५१ देशांची यादीच दाखवली होती. विनोद म्हणून सोडून द्यावा की आपल्या देशाचे नाव त्या यादीत नाही म्हणून हायसे वाटून घ्यावे, यांमध्ये संभ्रम वाटावा असे विनोदाच्या रूपातले, पण दाहक सत्य सांगणारे असे ते राजकीय भाष्य होते. तेव्हापासून आजपर्यंत त्या यादीत अनेक देशांची भरच पडली असेल. जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्था निर्माण होण्याच्या लाटा गेल्या काही शतकांमध्ये येत राहिलेल्या आहेत; आणि वास्तवाच्या किनाऱ्यावर येऊन फुटत आलेल्या आहेत. त्यापैकी सर्वांत अर्वाचीन लाट नव्वदच्या दशकात आली तेव्हा एकंदर माहोल असा भासवला जात असे की आता इथून परत फिरणे नाही. परंतु ते सर्व जेमतेम दीड-दोन दशके चालून सगळे वारे पुनश्च देश-आधारित व्यवस्थेकडे जोमाने फिरलेले दिसतात. आंतरराष्ट्रीय व्यापार जरी चालू असला तरी सत्ताकारण मात्र जागतिक न होता देश-केंद्रित झाले आहे. अमेरिका, रशिया व चीनसारख्या अनेक मोठ्या अर्थव्यवस्था आणि इतर अनेक लहानमोठे देश जागतिक दृष्टी असलेले राजकारण न करता आपापला देश सर्वोपरी अशा प्रकारचे राजकारण उघडपणे करताना दिसू लागले. यामधून लोकशाही व्यवस्था जगभर जोपासणे, संपूर्ण मानवजातीच्या दीर्घकालीन भवितव्यासाठी काम करणे या गोष्टी दुय्यम ठरू लागल्या आहेत. जगात वाढत जाणारी हुकूमशाही देशांची यादी हा त्याचाच परिपाक आहे. हे सर्व भयावह आहे. बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या एस्कीमो लोकांच्या भाषेत वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फासाठी ७० वेगवेगळे शब्द आहेत. तसेच जगभरात वाढत जाणारी वेगवेगळ्या प्रकारची हुकूमशाही पाहता, त्यातील सूक्ष्म फरक दर्शवणारे अनेकविध शब्दही आता आपल्या रोजच्या वापराच्या भाषेत वारंवार येऊ लागले आहेत.

‘जगभरातले धटिंगण’, निळू दामले

समकालीन प्रकाशन, पाने-१२४, किंमत-२०० रुपये.

vineelvb@gmail.com