जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात सोमवारी दुपारी दहशतवाद्यांनी लष्करी ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात पाच लष्करी जवान हुतात्मा झाले आणि सहा जण जखमी झाले. ही घटना भारतीय लष्कराच्या ९ कॉर्प्सच्या हद्दीत घडली. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले, “जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. हा परिसर भारतीय लष्कराच्या ९ कॉर्प्सच्या अंतर्गत येतो.” जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. हा हल्ला नेमका कसा झाला? या हल्ल्यामागे नक्की कोणाचा हात आहे? ते जाणून घेऊ आणि जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांवर एक नजर टाकू.

कठुआ हल्ल्यामागे कोण?

माध्यमांतील वृत्तानुसार, दुपारी ३.३० च्या सुमारास कठुआपासून १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहाई मल्हारमधील बदनोटा गावाजवळ माचेडी-किंडली-मल्हार मार्गावर नियमित गस्तीवर असलेल्या लष्कराच्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. ‘एनडीटीव्ही’नुसार लष्करी वाहनात १० जवान होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले; परंतु दहशतवादी शेजारच्या जंगलात लपले. अजूनही दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये अधूनमधून चकमक सुरू असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

Russian Emperor Paul I Russia once planned to invade and capture India
रशियाचा झार जेव्हा भारत गिळंकृत करायला निघाला होता!
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
jo biden cognitive test
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ‘कॉग्निटिव्ह टेस्ट’ करण्याचा सल्ला का दिला जातोय? ही चाचणी नेमकी काय आहे?
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
News About IAS Pooja Khedkar
IAS पूजा खेडकरांचा भलताच रुबाब; वरीष्ठ अधिकाऱ्यांचं टेबल हटवलं, ऑडीला लाल दिवा लावल्याचा ‘कार’नामा समोर
IAS Puja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर; दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट
Suchitra Krishnamoorthi attended naked party
बर्लिनमध्ये Naked Party मध्ये सहभागी झाली बॉलीवूड अभिनेत्री, २० मिनिटांत काढला पळ; म्हणाली, “मला कुणाचेही प्रायव्हेट पार्ट…”
pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!

हेही वाचा : ई-कॉमर्स वेबसाइटवर चक्क बॉस आणि सहकर्मचारी काढले विकायला? काय आहे हा प्रकार?

एका अधिकाऱ्याने सांगितले की जखमींना लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, बंदी घातलेल्या पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ (जेईएम)ची संघटना ‘काश्मीर टायगर्स’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार ‘हिजबुल मुजाहिदीन’चा कमांडर बुरहान वानी याच्या आठव्या पुण्यतिथीच्या दिवशी हा हल्ला करण्यात आला.

जम्मू-काश्मीरमध्ये वाढणारे दहशतवादी हल्ले

जम्मू-काश्मीरमध्ये काही महिन्यांपासून अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. रविवारी सकाळी राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट भागात लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाल्यानंतर जम्मू विभागात झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. त्या वेळी छावणीचे रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांनी त्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आणि अतिरेक्यांना त्यांच्या स्थानावरून पळवून लावले होते. या प्रदेशात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी कसून शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे.

राजौरी जिल्ह्यात घडलेल्या आणखी एका दुर्घटनेत लष्कराच्या तळाजवळ गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. मांजाकोट लष्करी छावणीवर रात्रभर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या दाव्याला लष्कराने अद्याप पुष्टी दिलेली नाही. परंतु, यात एक जवान हुतात्मा झाल्याची माहिती आहे. जम्मू-कश्मीरच्या कुलगाम भागात दोन वेगवेगळ्या हल्ल्यांत सहा दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याच्या अवघ्या २४ तासांनंतर कठुआमध्ये हा हल्ला झाला आहे. शनिवारी झालेल्या चकमकीत एका पॅराट्रूपरसह दोन जवानांना जीव गमवावा लागला आणि आणखी एक जवान जखमी झाला होता, असे अधिकाऱ्यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना सांगितले.

एका मोहिमेमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्याला लक्ष्य करण्यात आले होते. शनिवारी रात्री उशिरा सुरक्षा जवानांनी हा अड्डा उद्ध्वस्त केला आणि दोन दहशतवाद्यांचे मृतदेह बाहेर काढले. त्याच वेळी, कुलगामच्या फ्रिसल भागात आणखी गोळीबार झाला. गोळीबारानंतर ड्रोन फुटेजमध्ये चार दहशतवाद्यांचे मृतदेह आढळून आले. या चकमकीत एक जवान शहीद झाला; तर दुसरा जखमी झाला. ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये बशीर दार, जाहिद अहमद दार, तौहीद अहमद राथेर व शकील अह वानी या चार जणांचा समावेश होता. मोदेरगाममध्ये ठार मारण्यात आलेल्या अन्य दोन दहशतवाद्यांची नावे फैजल व आदिल, अशी आहेत. राष्ट्रीय रायफल्सचा हवालदार राज कुमार हा फ्रिसलच्या लढाईत हुतात्मा झाला; तर पॅरा कमांडो व लान्स नाईक प्रदीप नैन हे मोदेरगाममध्ये हुतात्मा झाले.

जूनमधील रियासी हल्ला

जूनमध्ये रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केला होता. ती बस दरीत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला होता. दोन सशस्त्र दहशतवादी एका गावात लपून बसले होते. त्यांनी काही दिवसांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा झाला. सीआरपीएफच्या पथकाने गोळीबार करून दहशतवाद्यांना ठार मारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच महिन्यात जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील गंडोह भागात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली; ज्यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले. काश्मीर खोऱ्यातील नुकतेच झालेले हल्ले याच दहशतवाद्यांनी केले, असे मानले जात होते. त्यांच्याजवळ युनायटेड स्टेट्समध्ये तयार करण्यात आलेल्या एम ४ कार्बाइन्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि पैसेदेखील सापडले.

जम्मू-काश्मीरमध्ये सतत दहशतवादी हल्ले का होतायत?

‘एनडीटीव्ही’नुसार, सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पाकिस्तानमध्ये तैनात असलेल्या प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबा संघटनेच्या रेझिस्टन्स फ्रंटच्या कार्यकर्त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली. या कार्यकर्त्याचे नाव सैफुल्लाह साजिद जट असे असून, तो पाकिस्तानातील कसूर जिल्ह्यातील पंजाबी जिल्ह्यातील शांगमंगा गावातील रहिवासी आहे. ‘एनआयए’ने त्याला कट्टर दहशतवादी म्हणून घोषित केले आणि त्याच्या डोक्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.

विरोधकांकडून हल्ल्याचा निषेध

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले की, असे सततचे हल्ले थांबविण्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे; पोकळ भाषणे आणि खोट्या आश्वासनांची नाही. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराच्या चार शूर जवानांच्या हौतात्म्याने मला खूप दुःख झाले आहे. सहा जवानही जखमी झाले आहेत. लष्करावरील या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.”

दहशतवादाविरुद्धची लढाई शेवटच्या टप्प्यात : पंतप्रधान मोदी

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सकाळी जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “बडनोटा, कठुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्करातील पाच शूर सैनिक हुतात्मा झाल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. या कठीण काळात राष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दहशतवादविरोधी कारवाया सुरू आहेत आणि आमचे सैनिक या प्रदेशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहेत. या भयंकर दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले सैनिक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.”

हेही वाचा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ‘कॉग्निटिव्ह टेस्ट’ करण्याचा सल्ला का दिला जातोय? ही चाचणी नेमकी काय आहे?

केंद्रशासित प्रदेशातील दहशतवादाविरुद्धची लढाई शेवटच्या टप्प्यात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात संसदेत सांगितले होते. उर्वरित नेटवर्क नष्ट करण्यासाठी बहुआयामी रणनीती अवलंबण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. “जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरुद्धची आमची लढाई एक प्रकारे शेवटच्या टप्प्यात आहे. तेथील उरलेले दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्यासाठी आम्ही बहुआयामी रणनीती घेऊन पुढे जात आहोत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.