डॉ नंदू मुलमुले

असं म्हणतात, की ‘म्हातारपण केव्हा येतं?… तर एकेक अवयव दुसऱ्या अवयवाकडे बोट दाखवून जेव्हा आपल्याला विचारतो, की ‘त्यानं दुखणं काढलंय?… मग आता माझ्याकडे पहा!’ ’ पण खरंच असं एकेका अवयवानं ‘दाद देण्याची’ वाट पाहातच म्हातारपण काढावं का?… शरीर थकल्यावर जोम बाळगावा असं काहीच आयुष्यात सापडणार नाही का?…

Loksatta chaturanga life husband and wife relationship
इतिश्री : कसोटीनंतरचा नात्यांचा पडताळा!
Personality disorders in humans in marathi
स्वभाव-विभाव : व्यक्ती तितक्या प्रकृती…
chaturang article, modern child rearing, Daily Struggles of Feeding child, child feeding, child rearing, marathi article
सांदीत सापडलेले.. : पूर्णब्रह्म!
chaturang a normal boy
सांदीत सापडलेले : एक नॉर्मल मुलगा!
Loksatta chaturang Menstrual cycle maternity leave Professionals of women Parental Leave
स्त्री ‘वि’श्व : मातृत्वाच्या रजेतील ताणेबाणे
Conscious Living, Find Balance in a Fast Paced World, Find Balance in professional and personal life, personal life, professional life, disciplined life, take time for self, chaturang article, marathi article,
जिंकावे नि जगावेही : आयुष्याचा ताल आणि तोल!
chaturanga anti aging marathi news
कारी बदरी जवानी की छटती नहीं…
Yatra, fairs, Opinion, jatra,
गर्दीच्या गारुडात गारद विवेक

बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था, हे आयुष्याचे तीन टप्पे. एक काळ शिक्षणाचा, दुसरा कर्तृत्वाचा आणि तिसरा निवृत्तीचा. मात्र तंत्रज्ञानानं मोठी झेप घेऊन माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आणि ही मांडणी अल्पावधीत कालबाह्य झाली, वरचेवर अधिकाधिक विसंगत होऊ लागली. आता तिसरा टप्पा अधिक शिकण्याचा, अधिक कर्तृत्वाचा! हा माधवराव आणि सरिताताईंनी ‘त्या’ दिवशी काढलेल्या सहलीतल्या वैचारिक मंथनाचा निष्कर्ष.

माधवराव-सरिताताई हे मित्रमंडळींत कायम उत्साहानं फसफसलेलं जोडपं. परिसरातले निवृत्त लोक जमवून सतत निरनिराळे उपक्रम राबवणं हे त्यांचं आवडीचं काम. माधवराव भूविज्ञान (जिऑलॉजी) विभागातून आठ वर्षांपूर्वी निवृत्त झाले. भूविज्ञान म्हणजे आपल्या भूमातेच्या प्रकृतीचं भौतिक आणि रासायनिक अध्ययन, विश्लेषण आणि परिणामी संवर्धन करणारं शास्त्र. सरकारी यंत्रणेत असं काही खातं आहे, याचा पत्ताही नसणाऱ्या आपल्या टोळीतल्या मित्रांना माधवराव न थकता हे समजावून सांगायचे. सरिताताई शिक्षिका. आवडता विषय जीवशास्त्र. त्यांनीही आपला शिक्षकी पेशा सांभाळून नवऱ्याला साथ दिली. असं हे उपक्रमी जोडपं.

हेही वाचा : ‘समाजप्रक्रिया’ हिंसेनंतरची आणि पूर्वीचीही

दर रविवारी जवळच्या एखाद्या पुरातन स्थळाची सहल ठरलेली. त्यात आज सगळ्यांना एकत्र जमवून शेतात पिठलं-भाकरीचा बेत केलेला. माधवरावांच्या टोळीत त्यांच्या खात्यातून निवृत्त झालेले सहकारी होते, तसे कॉलनीतले विविध क्षेत्रांतले ज्येष्�� नागरिकही. डॉ. सांगवीकर निवृत्त पशुवैद्याकीय अधिकारी आणि त्यांची बायको कविता गृहिणी. नवऱ्याच्या सतत बदलीच्या नोकरीनं तिला बिचारीला स्वत:च्या ‘एम.एस्सी. रसायनशास्त्रा’ला भांड्याकुंड्यातच ठेवावं लागलं. प्रा. सावंत ‘भौतिकी’चे, मात्र त्यांना गाण्यात रुची. रफीची गाणी गुणगुणत, ऐकत विद्यार्थ्यांचे पेपर तपासायचे आणि ‘आहाहा, वाह-वाह’ करत गुण द्यायचे! त्यांची बायको मंदा हिचा हिंदी गाण्यांशी दूर-दूर संबंध नव्हता. अरविंदा त्यातल्या त्यात ‘तरुण पेन्शनर’. पन्नाशीत बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेला. बायको निशाला नवऱ्याच��� हा निर्णय अजिबात आवडलेला नव्हता, ते ती उघड बोलून दाखवायची. अरविंदाजवळ याचं उत्तर नव्हतं, मात्र आपली मन:स्थिती बायको ओळखू शकत नाही याची खंत तेवढी होती. माधवराव त्याची घालमेल ओळखून होते, त्यामुळे त्यांचं आणि अरविंदाचं चांगलं जमायचं.

असं हे टोळकं माधवरावांच्या शेताला निघालं तेव्हा चांगलं उजाडलं होतं. एका इनोव्हा गाडीत सहा ज्येष्ठ नागरिक (‘श्रेष्ठ नागरिक’ म्हणा, हा माधवरावांचा आग्रह!) आणि एक चालक. खूप दिवसांनी अशा सहलीचा आलेला प्रसंग, त्यामुळे वातावरण उत्साहाचं होतं. इतकं, की प्रा. सावंतांनी ‘चक्के पे चक्का, चक्के पे गाडी’ म्हणत गाणं ओरडणं सुरू केलं आणि त्याला चक्क सगळ्यांनी साथ दिली. डॉ. सांगवीकर मात्र थोडे हिरमुसल्या चेहऱ्यानं सारी गंमत पाहात होते. त्यांचा गुडघा सकाळपासून दुखत होता. माधवरावांच्या आग्रहामुळे ते सामील झाले होते. मोटार गंतव्यस्थानी पोहोचली तेव्हा माधवरावांनी त्यांना काळजीपूर्वक आधार देऊन उतरवलं.

हेही वाचा : कारी बदरी जवानी की छटती नहीं…

डॉ. सांगवीकरांना लंगडत चालताना पाहून प्रा. सावंतांचं गाणं घशातच अडकलं. सारे हिरव्यागार निंबाच्या सावलीत विसावले तेव्हाच त्यांना कंठ फुटला, ‘ये दुनिया, ये मेहफिल, मेरे काऽऽम की नहीं…’. त्यांना आळवून ‘काऽऽम की नहीं’ म्हणताना माधवरावांनी थांबवलं. ‘‘अरे सावंत, ही मैफल आपल्या कामाची नाही, तर कोणाच्या?’’
तेवढ्यात गड्यानं उसाच्या रसाचे थंडगार पेले आणून ठेवले. आता चर्चेला तोंड फुटलं. ‘‘माधव, हे जग तरुणाईचं आहे, म्हाताऱ्यांचं नाही! आता बघा, प्रकृतीच्या तक्रारी सुरू होणार. एकेक अवयव उत्तर देत जाणार…’’
‘जवाब दे जाना’चं त्यांनी केलेलं थेट भाषांतर ऐकून अरविंदाला हसू आलं.

‘‘तू हसशील रे, तू अजून कोवळा, नवथर बुढ्ढा आहेस! सत्तरी ओलांडली की कळेल! मी म्हणतो ते खरंय की नाही मंडळी?’’
डॉ. सांगवीकरांनी मान डोलावली. ‘‘आधी रक्तदाब, मग मधुमेह. फॉलोड बाय मोतीबिंदू, संधिवात, स्मृतिभ्रंश… ही म्हाताऱ्यांना झपाटणारी भुतं.’’ त्यांनी यादीच सादर केली.

माधवरावांना हे अर्थातच मंजूर नव्हतं. मात्र त्यांच्या वतीनं प्रतिवादाला पुढाकार घेतला निवृत्त होऊनही जीवशास्त्रात जीव रमलेल्या सरिताताईंनी. ‘‘मला सांगा मंडळी, बालपण, तारुण्य, मध्यमवय, कुठल्या वयोगटाला झपाटणारी भुतं नाहीत? अतिसार, विषाणूजन्य ताप, आकडी, खोकला हे बालपणीचे आजार. म्हाताऱ्यांना गालगुंड होत नाहीत! प्रतिकारशक्ती सगळ्या जिवाणू-विषाणूंचा सामना करून आलीय, त्यामुळे सहसा असे जंतुसंसर्ग होत नाहीत ही आनंदाची गोष्ट नाही?’’
‘‘तरुणाई आपण आयुष्याचा सुवर्णकाळ मानतो. त्या वयोगटाच्या वाट्याला विकारांचं वेगळं पॅकेज असतंच.’’ आता माधवराव सरसावले. ‘‘तरुणींना पीसीओडी, त्यामुळे लठ्ठपणा, बाळंतपणात होणारे आणि जिवावर बेतणारे आजार. तरुणाईत भलत्या गोष्टींच्या नादी लागण्याचा संभव अधिक. ड्रग्जसारखी व्यसनं, ‘एचआयव्ही’सारखे संसर्ग, बेफाम वेगानं वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात, हे बेदरकारीतून होण्याची शक्यता जास्त…’’
अरविंदाला हे लॉजिक पटू लागलं. ‘‘खरंय, मी तरुणपणी ज्या वेगानं बाइक चालवायचो, आता तो वेग मला झेपत नाही. म्हातारे चालक सहसा अपघात करत नाहीत!’’

हेही वाचा : सांदीत सापडलेले.. : पूर्णब्रह्म!

‘‘पण तरुणपणीचा जोश, जोम म्हातारपणी कमी होत जातो हे खरं ना?’’ सावंतांनी मुद्दा मांडला. नशीब ‘याद न जाये, बीते दिनोंकी’ म्हणत त्यांनी गळा काढला नाही, त्यामुळे सगळ्यांनी सुस्कारा सोडला! पण मुद्दा खराच होता. आता झोपेतून पटकन उठणं होत नाही, गाडी पकडायला धावणं होत नाही, एवढंच काय, तर नातवंडांच्या मागे ऊठबस होत नाही, हे सारं सत्य.

‘‘मंडळी, शारीर कष्टांची गरज होती त्या विसाव्या शतकापर्यंत हे सगळे ताकदीचे गुण आवश्यक होते. आता बोटांच्या छोट्या स्नायूंनाही कष्टवण्याची गरज नसलेलं युग आहे. रिमोट, किल्ली जाऊन आता आवाजी आज्ञा ऐकणारे यंत्रमानव आले आहेत. आता अचाट शारीर ताकदीचे उपयोग संदर्भहीन झाले आहेत. पूर्वी तलवारीनं लढाई करत, आता मिसाइल सोडायला संगणकासमोर खुर्चीत बसून करंगळीनं बटण दाबलं तरी पुरे! फुगवलेले स्नायू आता फक्त शरीरसौष्ठव स्पर्धेच्या कामाचे.’’
‘‘म्हणजे फिटनेसचं महत्त्व उरलं नाही म्हणता?’’ मंदा काकूंच्या आवाजात आश्चर्य होतं. इतरांच्याही भुवया उंचावल्या.
‘‘असं कुठे म्हटलं मी! फिटनेसचं महत्त्व वादातीत आहे. आधुनिक वैद्याकशास्त्रानं तुम्हाला अतिरिक्त आयुष्य दिलं आहे. आपल्या राहून गेलेल्या इच्छा पूर्ण करण्याची संधी दिली आहे. फक्त व्यायाम आणि योग्य आहार घेऊन तुम्हाला शरीर फिट ठेवायचं आहे. जगात सगळी शारीर आणि बुद्धीची कामं ‘आउटसोर्स’ होतात, फक्त दोन गोष्टी सोडून…’’ माधवरावांनी क्षणभर दम घेतला, पण तेवढाही वेळ अरविंदाच्या बायकोला- निशाला राहवलं नाही. ‘‘कुठल्या दोन गोष्टी?’’
‘‘इमोशन्स अॅन्ड एक्झरसाइज! भावना तुमच्या तुम्हालाच अनुभवाव्या लागतात आणि व्यायाम तुमचा तुम्हाला करावा लागतो. तुमच्या वतीनं कुणी रडू शकत नाही, तुमच्या वेदना कुणी घेऊ शकत नाही आणि व्यायामासाठी नोकर ठेवता येत नाही! नाहीतर श्रीमंत-धनिकांची तरुण पोरं दीडशे किलोंची झाली नसती…’’

हेही वाचा : माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!

सांगवीकरांनी गुडघा जवळ घेतला. उसाचा रस लवकर संपल्याची त्यांना जाणीव झाली. ‘‘माधवभाई, मृत्यू जवळ आल्याची भावना घाबरवते. मनाला उदास करते. हे तर म्हातारपणाचं प्राक्तन आहे ना? त्याच्यापासून सुटका नाही.’’
‘‘पुन्हा तोच मुद्दा,’’ पुन्हा सरिताताई पुढे सरसावल्या. ‘‘मृत्यूची शक्यता कुठल्या वयोगटात नाही? संशोधन सांगतं, की म्हातारपणापेक्षा जन्मत: अर्भकाच्या मृत्यूची शक्यता अधिक. पुढे पौगंडावस्थेत पुन्हा मृत्यूचं भय अधिक. त्यात व्यसनं, अपघात, हिंसा, ही कारणं ठळक. आपण आपलं मरण ओढवून घेण्याइतकं वाईट दुसरं काही नाही. कमीतकमी म्हातारे मरणाच्या भीतीनं का होईना, आपली प्रकृती सांभाळून राहतात. मृत्यूचं भय माणसाला शहाणं तर करतं!’’ सरिताताईंनी सडेतोड मुद्दा मांडला, तो साऱ्यांनाच पटला.

कविता- सांगवीकरांची पत्नी त्या वाक्यावर विचार करत राहिली. अचानक तिला आपली सासू आठवली. ‘‘कसलं शहाणपण! म्हातारी माणसं अधिक चिडचिडी, अविवेकी, इतरांची पर्वा न करणारी आणि कुटुंबावर कायम आपलाच वचक राहावा असा हट्ट धरणारी होऊन जातात!’’ ही आपल्या मातोश्रींना आठवते आहे, हे सांगवीकरांच्या पटकन लक्षात आलं, पण ते काही बोलले नाहीत. आपल्या बायकोनं खूप काही सहन केलंय याबद्दल त्यांना वाईट वाटत होतं.
‘‘हा खरा मुद्दा!’’ निशालाही आता कंठ फुटला. ‘‘खरंच, म्हातारपणी माणसानं वरचेवर शांत, सहनशील, समजूतदार व्हायला हवं की नाही?’’
‘‘बरोब्बर!’’ माधवरावांनी गड्याच्या हातून रसरशीत आंब्याच्या फोडी कापलेलं ताट सगळ्यांच्या मध्ये ठेवलं.

हेही वाचा : जिंकावे नि जगावेही : मीच लिहिले पत्र मला!

‘‘मंडळी, ताजी फळं, नैसर्गिक आहार, पुरेसा व्यायाम, पैशांचं नेटकं नियोजन, हवा तो छंद, हवं ते आयुष्य जगण्याचं मिळालेलं स्वातंत्र्य आणि आयुष्य नावाच्या खेळाचं अनुभवानं पक्व झालेलं ज्ञान… ज्येष्ठ वय सगळ्या वयोगटांपेक्षा असं समृद्ध होऊ शकतं. मात्र अजून एक गोष्ट हवी- ‘शहाणीव’… ‘व्हिज्डम’. ‘काय बोलावं’पेक्षा ‘काय बोलू नये’ हे सांगते ती शहाणीव. तारतम्य, कृतज्ञता, क्षमाशीलता देते ती शहाणीव. विद्यार्थीदशेत मिळते ती माहिती, प्रौढपणी प्राप्त होतं ते ज्ञान… मात्र शहाणीव किमान साठीत यावी ही अपेक्षा! तरुणांना त्यांचं आयुष्य ठरवू द्या, विचारलं तर सल्ला द्या. तीन पिढ्यांचा संसार करू नका! जगावर ताबा राखण्याची धडपड सोडा. क्षमाशील व्हा. जात, धर्म, रूढी, पंथ यांच्यापलीकडे जा. बाकी सगळ्या गोष्टी ज्येष्ठांच्या अनुकूल आहेत. जीवनाचा हा सर्वोत्तम काळ आहे. नवनवीन गोष्टी शिका, नवे मित्र जोडा, नवे छंद लाज न बाळगता जोपासा…’’

माधवरावांच्या जोशानं सांगवीकर हातात आंब्याची फोड घेऊन पाहात राहिले. साऱ्यांनाच नवी उभारी आल्यासारखं वाटू लागलं. म्हातारपणावर एक नवा प्रकाश पडल्यासारखा वाटू लागला. सावंत भानावर आले, तेच एक लकेर घेत- ‘हे मना, आज कोणी बघ तुला साद घाली… जाण रे, दाटलेली ही किमया भोवताली’. या वेळी मात्र त्यांना सगळ्यांनी- अगदी मंदानंही साथ दिली!
nmmulmule@gmail.com